रोहित पवार vs वळसे पाटील
राष्ट्रवादी पक्षात झालेल्या राजकीय फुटीनंतर राष्ट्रवादीमध्ये अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत.
दोन्ही गटांनी एकमेकांविषयी विरोधात रणशिंग फुंकले आहे.
राष्ट्रवादीचे कर्जत मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी आंबेगाव मतदार संघाचे आमदार दिलीप वळसे पाटील यांना टॅग करत #तुम्हाला_काय_केलं_होतं_कमी? #का_पत्करली_गुलामी? अशा आशयाची पोस्ट ट्विटरवर पोस्ट केली होती.
ही पोस्ट वळसे पाटलांच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यामुळे आज रोहित पवार vs वळसे पाटील असे शाब्दिक युद्ध झाले.
रोहित पवार यांचे ट्विट
मा. वळसे-पाटील साहेब आदरणीय पवार साहेबांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलेला नेता म्हणून तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो. तुमच्यावर तर साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता.
पण अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला आपली निष्ठा गहाण ठेवावी लागली.
आपल्या विचारधारेला मूठमाती द्यावी लागली, हे महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय. केवळ सत्तेसाठी अशा प्रकारची बंडखोरी आपल्या सारख्या जेष्ठ नेत्याकडून अपेक्षित नव्हती.
असो! प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद आमच्या #सह्याद्रीत आहे. सह्याद्रीच्या बाजूने संपूर्ण महाराष्ट्र उभा असून हा सह्याद्री नव्या जोमाने आणि नव्या ताकदीने उभा राहीलच,
परंतु वळसे-पाटील साहेब तुम्ही स्वतःला तुमच्या या कृतीबद्दल माफ करू शकणार का? #तुम्हाला_काय_केलं_होतं_कमी? #का_पत्करली_गुलामी?
काय म्हणाले दिलीप वळसे पाटील
मला सार्वजनिक जीवनात (राजकारणात) येऊन चाळीस वर्षे झाली. त्यांचं (रोहित पवार यांचं) आजचं वय 37 वर्ष आहे.
त्यांनी एक पोस्ट टाकली की, तुम्हाला आणखीन काय काय द्यायला पाहिजे. मी म्हटलं रोहित मतदार संघाचा प्रश्न असेल.
तर तुम्हाला माझी एक विनंती आहे. की पाहिजे तर मी आमदारकी सोडतो तुम्ही आंबेगावला उभे रहा.
पण हे काम करू नका.
प्रत्युत्तरात काय म्हणाले रोहित पवार
आदरणीय वळसे पाटील साहेबांनी माझ्याबद्दल एक वक्तव्य केलं. बोलत असताना माझ्या वयाबद्दल ते बोलले.
माझं वय नक्कीच कमी आहे. एखादी भूमिका घेण्यासाठी वयाचा विषय कधीपासून यायला लागला. पण 40 वर्ष पवार साहेबांबरोबर राहून पद मिळाली, नाही मिळाली हे लोकांना माहिती आहे.
तरीसुद्धा पवार साहेबांची भूमिका आपल्याला कळाली नसेल. एक विचारसरणी ही जर कळाली नाही तर यामध्ये मी कसा चुकीचा आहे.