Anti-narcotics squad seizes 96 kg of ganja, seizes goods worth Rs 63 lakh, including three others अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई, ९६ किलो गांजा जप्त, तीन जणांसह ६३ लाख रुपये किमतीचा माल ताब्यात

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया Pimpri Chinchwad Police Commissionerat
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने आंतरजिल्हा गांजा तस्करी करणाऱ्या एका महिलेसह तीन जणांना अटक केली आहे. या कारवाईत ९६ किलो गांजा तसेच दोन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत सुमारे ६३ लाख रुपये आहे.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर आळा घालण्यासाठी तसेच या पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी विशेष आदेश दिले होते. या आदेशानुसार, गुन्हे शाखेच्या उपआयुक्त संदिप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या विविध तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.
चाकण पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अधिकाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली की, एमएच०३/एएम/८१८३ या सिल्व्हर रंगाच्या टोयोटा इनोव्हा आणि एमएच१८/बीआर/३४४२ या पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी इको या दोन वाहनांमध्ये गांजा वाहून नेण्यात येत आहे. ही माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ दोन पथके तैनात केली आणि पुणे-नाशिक रोडवरील रोहकल फाट्यावर नाकाबंदी करून दोन्ही वाहने ताब्यात घेतली. वाहनांमध्ये एकूण ९६ किलो २०४ ग्रॅम गांजा असलेली सहा पोती सापडली.
अटक केलेल्या आरोपींची नावे संजय पांडुरंग मोहिते (३९), मन्साराम नुरजी धानका (४०) आणि एक महिला आहेत. आरोपींकडून दोन चारचाकी वाहने, तीन मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध चाकण पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २०(ब)(ii)(क) आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी संजय मोहितेविरुद्ध यापूर्वीही अंमली पदार्थांशी संबंधित दोन गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध हैद्राबाद येथेही गांजा तस्करीचा गुन्हा नोंदवला गेला आहे.
या कारवाईत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहायक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, उपआयुक्त संदिप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे, बाळासाहेब कोपनर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस अंमलदार प्रदिप शेलार, किशोर परदेशी, मयुर वाडकर, शिल्पा कांबळे, निखिल शेटे, निखिल वर्पे, कपिलेश इगवे, मितेश यादव, चिंतामण सुपे, सुनिल भागवत, महादेव बिक्कड आणि तांत्रिक विश्लेषण विभागाचे प्रकाश ननावरे यांचा सहभाग होता.
पोलीस आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्धच्या मोहिमेला गती देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, यापुढेही अशा प्रकारच्या गुन्हेगारीविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल.