Called to work in inn, attacked by husband खानावळीत कामाला बोलावले, पतीकडून हल्ला

खानावळीमध्ये काम करणाऱ्या महिलेला कामावर बोलावण्यासाठी मालक तिच्या घरी गेला. यावेळी महिलेच्या पतीने खानावळ मालकावर कात्रीने जीवघेणा हल्ला केला. यामध्ये खानावळ मालक गंभीर जखमी झाला आहे.
ही घटना सोमवारी (दि. २३) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास शिंदे वस्ती मारुंजी येथे घडली.
प्रोसनजीत लालमोहन बिश्वास (वय ३३, रा. शिंदे वस्ती, मारुंजी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभंकर चंदन मंडल (वय २८, रा. शिंदे वस्ती, मारुंजी) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बिश्वास हे मारुंजी येथे खानावळ चालवतात. शुभंकर मंडल याची पत्नी बिश्वास यांच्या खानावळीमध्ये काम करते. तिला बोलावण्यासाठी बिश्वास तिच्या घरी गेले. त्यावेळी त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. यावरून शुभंकर याने बिश्वास यांच्यावर कात्रीने हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले.
या प्रकरणी हिंजवडी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान शहर परिसरामध्ये किरकोळ कारणावरून मारामारी आणि हल्ल्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.