Defamatory Content on Wikipedia About Chhatrapati Sambhaji Maharaj छत्रपती संभाजी महाराजांच्या बदनामीसाठी कठोर कायदेशीर कारवाईची मागणी

Defamatory Content on Wikipedia About Chhatrapati Sambhaji Maharaj छत्रपती संभाजी महाराजांच्या बदनामीसाठी कठोर कायदेशीर कारवाईची मागणी
विकिपीडिया या संकेतस्थळावर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह, हीन दर्जाचा, दिशाभूल करणारा आणि बदनामीकारक मजकूर प्रकाशित करण्यात आला आहे. भक्ती शक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश हिरामण बारणे यांनी लेखी पत्राद्वारे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांच्याकडे याबाबत तातडीने सखोल चौकशी करून संबंधित व्यक्ती/संस्थांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या पत्रात ते पुढे म्हणतात की, छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्याविषयी चुकीची माहिती हेतुपुरस्सर पसरवली जात आहे आणि त्यांचा गौरवशाली इतिहास विकृतपणे मांडण्याचा प्रकार मुद्दाम केला जात आहे. यामुळे समस्त हिंदुस्थानातील लाखो शिव शंभू प्रेमींच्या भावना दुखावल्या जात आहेत.
छत्रपती श्री संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे व समस्त हिंदू जनतेचे गौरवस्थान आहेत. त्यांच्या बदनामीसाठी अशी माहिती प्रसारित करणे अत्यंत निषेधार्ह आहे. या प्रकारामुळे समाजात असंतोष निर्माण होऊ शकतो आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
महेश हिरामण बारणे यांच्या पत्रात सायबर विभागाच्या मदतीने संबंधित मजकूर त्वरित काढून टाकण्याची मागणी करण्यात आलेली आहे. तसेच, या चुकीच्या मजकुरासाठी कडक कायदेशीर कारवाई केली जावी व संबंधित व्यक्तीला अटक करून भविष्यात अशा घटनांपासून समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना करण्यात आली आहे.