Dr. Shripal Sabnis expresses: ‘A Sensitive Government to Listen to the Voice of the Oppressed is Essential for a Progressive Democracy!’ डॉ. श्रीपाल सबनीस यांचे विचार: ‘उन्नत लोकशाहीसाठी संवेदनशील शासन असावे!’

Dr. Shripal Sabnis expresses: 'A Sensitive Government to Listen to the Voice of the Oppressed is Essential for a Progressive Democracy!' डॉ. श्रीपाल सबनीस यांचे विचार: 'उन्नत लोकशाहीसाठी संवेदनशील शासन असावे!'
उन्नत लोकशाहीसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात उपेक्षितांचा आवाज ऐकणारे संवेदनशील शासन असावे,’ असे विचार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरीगाव येथे बुधवार, ५ मार्च २०२५ रोजी व्यक्त केले. पाली – मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान आयोजित वार्षिक शब्दोत्सव उपक्रमांतर्गत जीवनगौरव व अन्य पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार डॉ. विश्वास मोरे अध्यक्षस्थानी होते; तसेच ज्येष्ठ पत्रकार पीतांबर लोहार, कृषिभूषण सुदाम भोरे, लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती यांची व्यासपीठावर आणि शिवाजी चाळक, संतोष गाढवे, आत्माराम हारे आदी मान्यवरांची सभागृहात प्रमुख उपस्थिती होती.
सन्मानचिन्ह, पुणेरी पगडी, मानपत्र, ‘समग्र बाबा भारती’ हा ग्रंथ आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव सन्मान प्रदान करून गौरविण्यात आले.
डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ‘समाज आणि संस्कृती दुभंगलेली असल्याने समाजाला एकसंध ठेवणारे सुसंवादी कार्यक्रम नितांत गरजेचे आहेत. या पार्श्वभूमीवर जात, समाज, पंथ या भिंती ओलांडून भिन्न विचारसरणीत सामाजिक एकोपा साधण्याची बाबा भारती प्रतिष्ठानची सर्वसमावेशक भूमिका महत्त्वाची आहे.’
सुदाम भोरे यांनी रयत शिक्षण संस्था, कविवर्य नारायण सुर्वे आणि फ. मुं. शिंदे यांच्याविषयी आठवणींना उजाळा दिला. पीतांबर लोहार यांनी ‘बाप’ या स्वरचित कवितेचे सादरीकरण केले. यावेळी गिरीश प्रभुणे यांनी आपला सन्मान स्वीकारताना सामाजिक कार्याविषयी विचार व्यक्त केले.
महेंद्र भारती यांनी वार्षिक शब्दोत्सव कार्यक्रमाची माहिती दिली. प्रा. डॉ. कामायनी सुर्वे यांनी मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमात सहभागी असलेल्या प्रमुख व्यक्तींनी आपल्या विचारांची मांडणी केली.