IT Professionals and Citizens of Hinjewadi Raise Voice Against Air Pollution हिंजवडीतील श्वास घेणे अवघड; नागरिकांचा प्रदूषणविरोधी मोर्चा

IT Professionals and Citizens of Hinjewadi Raise Voice Against Air Pollution हिंजवडीतील श्वास घेणे अवघड; नागरिकांचा प्रदूषणविरोधी मोर्चा
हिंजवडी, ता. ८ : भर लोकवस्तीतील आरएमसी प्लांटमुळे श्वास घेणे अवघड झाले आहे, शुद्ध हवा नाहीशी झाली आहे आणि श्वसन व त्वचाविकार जडत आहेत. अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे अपघातात वाढ झाली आहे. यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वारंवार पाठपुरावा केल्यावरही कोणीच दखल घेतली नाही. परिणामी, शनिवारी (ता. ८) लाखो रुपये कर भरणाऱ्या आयटी अभियंत्यांनी मूक मोर्चा काढला.
हे मोर्चे वाकड-ताथवडे हाउसिंग सोसायटीज फोरम यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले. सुमारे २० सोसायट्यांतील एक हजाराहून अधिक नागरिक हवेतील प्रदूषणाविरोधात आणि शुद्ध व निरोगी पर्यावरणासाठी एकत्र आले होते. सर्वांनी तोंडाला काळे मास्क व हाताला लाल रिबन बांधून मोर्चात सहभागी होऊन प्रशासनाच्या निषेधार्थ आवाज उठवला. त्याचप्रमाणे, सिमेंट मिक्स धूळ आणि बांधकामाच्या धुळीमुळे प्रदूषण वाढले आहे, यावर कारवाईची मागणी केली गेली.
हे मोर्चे कोहिनूर कोर्टयार्ड वन सोसायटीपासून इंदिरा स्कूलमार्गे वाकडकर चौकात संपले. मोर्चात महिलांसह ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांचाही मोठा सहभाग होता. मोर्चाचे प्रमुख फलक होते – “नको धूळ- शुद्ध हवा आमचा हक्क”, “प्रशासन झोपले, नागरिक त्रासले”, “प्रशासनाने हवेतील विष कमी करावे” इत्यादी.
मूक मोर्चात नागरिकांनी जाहीरपणे स्वच्छ हवा मिळवण्यासाठी एकजुटीचे वचन घेतले. या मोर्चामुळे प्रदूषणाच्या वाढत्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाला तातडीने ठोस उपाययोजना करावी लागणार आहे, असे मोर्चाच्या आयोजकांनी सांगितले.
मुख्य मागण्या:
- पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना पाठवलेल्या तक्रारींच्या कोणत्याही ठोस कारवाईची दखल घेतली गेली नाही.
- सिमेंट मिक्स धुळीचा थर रस्त्यांवर, गाड्यांवर आणि घरांवर साचत असून नागरिकांचे जीवनमान ढासळत आहे.
- सिमेंट मिक्स धूळ त्वरित बंद करावी.
- प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक नियम आणि उपाययोजना कराव्यात.
- वायू प्रदूषण पातळीची नियमित तपासणी करावी आणि अहवाल सार्वजनिक करावा.
- रस्त्यांची नियमित दोन वेळा साफसफाई करून धुळीचे प्रमाण कमी करावे.
- नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई व्हावी.
- रस्त्यांवरील झाडांची देखभाल करावी आणि त्यांना नियमितपणे पाणी द्यावे.
रहिवाशांनी मोर्चाचे नेतृत्व करत प्रशासनाच्या निषेधार्थ आवाज उठवला असून, यामुळे प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेगाने उपाययोजना करणे आवश्यक आहे. स्वच्छ व निरोगी वातावरणासाठी नागरिकांचे लढा सुरूच ठेवण्याचे ठरवले आहे.