Kirtan festival in Kamshet from 1st January कामशेतमध्ये १ जानेवारीपासून कीर्तन महोत्सव
मावळ तालुक्यात नवीन वर्षाची सुरुवात कीर्तन महोत्सवाने होणार आहे. श्री विठ्ठल परिवार (मावळ) या संस्थेच्या वतीने कामशेत येथे १ ते ५ जानेवारीदरम्यान कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे सातवे वर्ष असल्याची माहिती संस्थापक आमदार सुनील शेळके यांनी दिली. महोत्सवात दररोज दुपारी तीन ते चार या वेळेत हरिपाठ होणार आहे. दुपारी चार ते सहादरम्यान विठ्ठल जप, संध्याकाळी सहा ते आठदरम्यान हरिकीर्तन व रात्री साडेआठनंतर महाप्रसाद होणार आहे. महोत्सवाच्या ठिकाणी निवासी व्यवस्था नसल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले. बुधवार, १ जानेवारी रोजी हभप अक्रूर महाराज साखरे यांची कीर्तन सेवा होणार आहे. गुरुवारी हभप जयेश महाराज भाग्यवंत यांचे कीर्तन श्रवण करता येईल. ३ जानेवारी रोजी हभप शिवा महाराज बावसकर यांचे कीर्तन होणार आहे. चार जानेवारीस हभप आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज यांची कीर्तन सेवा होईल. ५ जानेवारीस हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या काल्याच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होईल.