Lakhs of Devotees Attend Tukaram Beej Celebration लाखो भाविकांच्या उपस्थितीत तुकाराम बीज सोहळा संपन्न

0
Lakhs of Devotees Attend Tukaram Beej Celebration लाखो भाविकांच्या उपस्थितीत तुकाराम बीज सोहळा संपन्न

Lakhs of Devotees Attend Tukaram Beej Celebration लाखो भाविकांच्या उपस्थितीत तुकाराम बीज सोहळा संपन्न

देहूगाव, १७ मार्च: जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन वर्षाची सांगता रविवारी श्री क्षेत्र देहू येथे ‘आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा रामराम घ्यावा’, या अभंगांच्या सुरावटीत झाली. तुकाराम बीजेनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी रणरणत्या उन्हात दुपारी बारा वाजता हरिनामाचा गजर केला. यानंतर नांदुरकीच्या वृक्षावर पुष्पवृष्टी करत, अबीर-बुक्का, पानफूल व तुळशीची उधळण करून तुकोबांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

देहूत दाखल झालेल्या दिंड्यांच्या फडांवर वारकरी आणि भाविक रात्रभर जागर, पहाटे काकड आरती, महापूजा आणि वीणा-टाळ-मृदंगाच्या साथीने भजनासह हरिनाम संकीर्तनात दंग झाले होते. पहाटेपासूनच पांडुरंगाच्या आणि श्री संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरात तसेच गोपाळपुरा येथील वैकुंठगमन मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

बीज सोहळ्याची सुरुवात पहाटे तीन वाजता काकड आरतीने झाली. संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे व विश्वस्तांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली. महापूजेनंतर भाविकांना मुख्य मंदिरात, शिळा मंदिर व वैकुंठगमन मंदिरात दर्शनासाठी सोडण्यात आले. त्यानंतर पादुका भजनी मंडपात आणल्या गेल्या.

सकाळी अकरा वाजता बाळा तानाजी कळमकर, कृष्णा पवार, मारुती गुंडाप्पा कांबळे, नामदेव भिंगारदिवे, अनिल गायकवाड, प्रकाश टिळेकर यांनी पालखी खांद्यावर घेतली. ‘पुंडलिक वरदा हरि विठ्ठल’चा जयघोष करत शिंगाडे, सनई, चौघडा व ताशाच्या गजरात पालखी महाद्वारातून बाहेर पडली आणि गोपाळपुऱ्यातील वैकुंठगमन मंदिराकडे रवाना झाली.

पालखी सकाळी ११:५० वाजता वैकुंठस्थान मंदिराच्या आवारात प्रदक्षिणा घालून नांदुरकीच्या झाडाखाली आली. तेथे बापूमहाराज मोरे देहूकर यांनी तुकोबांच्या महानिर्वाण प्रसंगावरील अभंगाचे निरुपण केले. यानंतर भाविकांनी नांदुरकीच्या झाडावर मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी केली.

हवेलीचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने व देवशाला माने, तहसीलदार जयराज देशमुख, नगराध्यक्षा पूजा दिवटे, मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, सरिता बारणे, सारिका शेळके, प्रियंका कदम यांच्या हस्ते आरती झाली. मुख्य कार्यक्रम संपल्यानंतर पालखी पुन्हा मुख्य मंदिराकडे रवाना झाली.

श्री संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन वर्षाची सांगता असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची अभूतपूर्व गर्दी झाली होती. कडक उन्हाळ्यामुळे संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने मुख्य मंदिराच्या आवारात राममंदिरासमोर मंडप घालण्यात आला होता. तसेच, मंदिर व नांदुरकीच्या झाडाखालील पारावर फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. भाविकांना दर्शनबारीतून सोडण्यात येत होते आणि इंद्रायणी नदीघाट भाविकांनी फुलून गेला होता. तुकाराम बीजेचा सोहळा पाहता यावा यासाठी यंदा दोन मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्या होत्या, ज्यामुळे भाविकांना मंदिरातील सोहळा सहज अनुभवता आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *