No Mayor, No Help: Poor Patients Suffer as Funds Remain Blocked महापौर नाही, मदत नाही: गरीब रुग्ण आर्थिक मदतीसाठी तरसले

No Mayor, No Help: Poor Patients Suffer as Funds Remain Blocked महापौर नाही, मदत नाही: गरीब रुग्ण आर्थिक मदतीसाठी तरसले
पिंपरी-चिंचवड , ता. १८: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गरीब रुग्णांना आर्थिक मदत मिळण्यासाठी आयुक्तांच्या स्वाक्षरीने अर्थसाहाय्य करावे, अशी मागणी आमदार महश लांडगे यांनी केली आहे. आयुक्त शेखर सिंह यांना पाठविलेल्या पत्रातून त्यांनी ही सूचना केली आहे.
सध्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये महापौर नसल्यामुळे या ट्रस्टच्या माध्यमातून निधीचे वितरण थांबले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार लांडगे यांनी ही महत्त्वपूर्ण सूचना केली आहे.
आमदार लांडगे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने ४ सप्टेंबर १९९१ रोजी पिंपरी-चिंचवड महापालिका चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना झाली आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून केवळ वैद्यकीय मदतच नव्हे, तर नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तींमध्येही गरीब व गरजू लोकांना मदत करण्याचे धोरण आहे. या ट्रस्टवर महापौर यांची पदसिद्ध अध्यक्ष म्हणून नियुक्ती होते.
तथापि, मार्च २०२२ मध्ये महापालिकेची मुदत संपल्यामुळे सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. ‘महापौर’ नसल्यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना त्यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी मिळणारी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत सध्या मिळू शकत नाही. कारण मदतीच्या धनादेशावर महापौरांची स्वाक्षरी आवश्यक असते.
या परिस्थितीत, आमदार लांडगे यांनी महापालिका अधिनियमातील संबंधित अटी व शर्तींच्या आधारे, नवीन महापौर नियुक्त होईपर्यंत आयुक्त तथा प्रशासक म्हणून आपल्या स्वाक्षरीने किंवा अतिरिक्त आयुक्तांच्या स्वाक्षरीने रुग्णांना आर्थिक मदत मिळण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी विनंती केली आहे.
याव्यतिरिक्त, आमदार लांडगे यांनी महापालिकेच्या जानेवारी २०२२ मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत आर्थिक मदतीची रक्कम पाच हजार रुपयांवरून १५ हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा जो प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता, त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. ती देखील त्वरित केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.