Pimpri-Chinchwad Police Crack Down on Drunk Drivers पिंपरी-चिंचवडमध्ये मद्यपी चालकांवर पोलिसांचा बडगा

Pimpri-Chinchwad Police Crack Down on Drunk Drivers पिंपरी-चिंचवडमध्ये मद्यपी चालकांवर पोलिसांचा बडगा
पिंपरी, ता. २१: मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या बेशिस्त चालकांविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत पोलिसांनी ४ हजार १५३ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली आहे.
मद्यपान करून वाहन चालविल्याने रस्ते अपघात होण्याचे प्रमाण अधिक असून यामध्ये वाहनचालकासह इतरांच्या जीवाला धोका निर्माण होतो. मद्याच्या नशेत वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अनेक अपघात झाले आहेत आणि निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला आहे. रस्त्याने शिस्तीत जाणाऱ्या वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मद्यपी चालकांचा फटका बसू शकतो आणि त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतात.
अशा मद्यपींना वठणीवर आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कडक पाऊले उचलली आहेत. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयांतर्गत असलेल्या विविध वाहतूक विभागांमध्ये वेळोवेळी नाकाबंदी लावून ब्रेथ अॅनायलायझरद्वारे वाहनचालकांची तपासणी करण्यात आली आणि दंड वसूल करण्यात आला.
एका नागरिकाने सांगितले की, एका मद्यपी वाहनचालकाने त्याच्या दुचाकीने त्यांच्या पादचारी मित्राला धडक दिली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील पिंजण यांनी सांगितले की, मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी लावली जाते आणि तपासणीत मद्यपान आढळल्यास रीतसर गुन्हा दाखल केला जातो. मद्यपी वाहनचालक नियमांचे उल्लंघन करून कसेही वाहने चालवतात, ज्यामुळे इतर चालक आणि पादचाऱ्यांना धोका निर्माण होतो.