Road blockade to smoothen traffic at Mukai Chowk मुकाई चौकात वाहतूक सुरळीत करण्यासाठी साठी रास्ता रोको
किवळे, मुकाई चौक परिसरातील वाहतूक यू-टर्न घेऊन धोकादायक पद्धतीने वळविण्यात आल्यानंतर अपघातांत वाढ झाली. त्यामुळे त्यावर योग्य उपाययोजना करून वाहतूक सुरळीत करण्याच्या मागणीसाठी मुकाई चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
महापालिका, पोलिसांकडून उपाययोजनांबाबत आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले. फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांच्यासह विविध पक्षांच्या पदाधिकारी, ग्रामस्थांनी मुकाई चौकातील वाहतूक उपाययोजनेच्या मागणीसाठी आंदोलन केले. गेल्या वर्षी सप्टेंबरच्या अखेरीला वाहतूक विभागाने निगडी-किवळे बीआरटी मार्गावरील मुकाई चौकातील वाहतूक यू-टर्न घेऊन वळवली होती. या मार्गावरील माळवालेनगर येथील बस थांब्याशेजारून वाहने वेगाने धोकादायक पद्धतीने वळविण्यात येतात, परंतु रावेतकडे वाहने जात असल्याने येथे अपघात होत आहेत.
आंदोलनात शिवसेना शहर प्रमुख नीलेश तरस, युवासेना जिल्हा प्रमुख राजेंद्र तरस, मनसेचे विनोद भंडारी, सचिन शिंगाडे, दिलीप कडलक, सुभाष आगळे, अरुण जगताप, कयुम शेख यांच्यासह अन्य पदाधिकारी, ग्रामस्थांनी सहभाग घेतला. महापालिकेचे उपअभियंता संजय काशिद, वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक प्रेम कुंभार यांना यावेळी निवेदन देण्यात आले. कनिष्ठ अभियंता संतोष कुदळे, गिरीश गुट्टे उपनिरीक्षक लखनकुमार व्हावळे, प्रशांत वाबळे, संपत वाघमारे आदी उपस्थित होते.