‘Vehicle-Free Day’ to be held in Pimpri Camp Area – Saturday and Sunday पिंपरी कॅम्प परिसरात ‘वाहनमुक्त दिवस’ – शनिवार व रविवार आयोजित
'Vehicle-Free Day' to be held in Pimpri Camp Area – Saturday and Sunday पिंपरी कॅम्प परिसरात 'वाहनमुक्त दिवस' – शनिवार व रविवार आयोजित
पिंपरी, ता. ४ : पिंपरी कॅम्प परिसरातील सर्व रस्ते, साई चौक ते महर्षी वाल्मिकी चौक रस्त्यावर वीकेंडला अर्थात शनिवार (ता. ८) आणि रविवारी (ता. ९) सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत महापालिकेने ‘वाहनमुक्त दिवस’ आयोजित केला आहे. यामध्ये झुंबा, लाइव्ह म्युझिक, महिला स्पर्धा, खाद्य स्टॉल्स असा अनोखा उत्सव असेल, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
शहरातील वाढत्या वाहनांमुळे, चालणे, सायकल चालवणे आणि सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे यांसारख्या पर्यायी आणि शाश्वत वाहतुकीला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘वाहनमुक्त दिन’ आयोजित केला आहे. पिंपरी कॅम्प परिसर हे शहरातील सर्वात वर्दळीचे क्षेत्र आहे, येथे दर तासाला आठ हजार नागरिक ये-जा करतात. या भागात पादचारीही मोठ्या प्रमाणात असतात. नागरिकांना मोकळ्या रस्त्यांचा आनंद घेता यावा, चालता यावे, धावता यावे आणि बाजार परिसराचा आनंद घेता यावा, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
उपक्रमाचे मुख्य आकर्षण:
- नागरिकांसाठी झुंबा, लाइव्ह म्युझिक, महिलांसाठी खेळ, विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स
- अनुकूल बाजार परिसर तयार करून मोकळ्या जागांचा आनंद घेता येईल
- बसण्यासाठी आरामदायी सोय उपलब्ध
- ‘वाहतूक’ आणि ‘रस्ता सुरक्षा’ यावर माहितीपट दाखवले जातील
वाहतूक नियोजन आणि पर्यायी व्यवस्था: शनिवार व रविवारी सकाळी नऊपासून महर्षी वाल्मिकी चौक ते शगुन चौक आणि शगुन चौक ते साई चौक या रस्त्यांवर वाहने बंद केली जातील. शगुन चौकातील उड्डाणपुलावरून येणाऱ्या सर्व वाहनांना फक्त उजवीकडे वळण्याची परवानगी असेल. तथापि, आपत्कालीन सेवांसाठी वाहतूक खुली राहील.
पर्यटकांसाठी पार्किंग आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था: पर्यटकांसाठी पार्किंग व्यवस्था आणि पीएमपी तसेच मेट्रो शटल सेवा उपलब्ध राहील. कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी सर्वात जवळचे मेट्रो स्थानक पीसीएमसी भवन आहे. बसने येणारे नागरिक लाल मंदिर, भाजीपाला बाजार, भाट नगर बस थांब्यावर उतरू शकतात.
कार्यक्रमाची सुविधा: दोन दिवस चालणार्या या उपक्रमात कॅम्पातील दुकाने सुरू राहतील. मालवाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था केली जाईल. अतिरिक्त मोबाइल शौचालये, बसण्याची सोय आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल.
हा उपक्रम स्थानिक नागरिकांच्या आणि व्यापारी संघटनांच्या सक्रिय सहभागातून आणि चर्चा करून ठरवला आहे. हा एक प्रायोगिक उपक्रम आहे. नागरिकांनी याचा अनुभव घेत ‘वाहनमुक्त दिवस’ संकल्पनेला पाठिंबा द्यावा.
शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका
बापू बांगर, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड
- ‘वाहनमुक्त दिवस’ या दोन दिवसीय कार्यक्रमामध्ये नागरिकांनी रस्ता सुरक्षा उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा आणि सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करावा