Verock-Vengsarkar Academy Triumphs in U-11 Cricket Tournament व्हेरॉक-वेंगसरकर अकादमीला ‘व्हेरॉक करंडक’ क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
Verock-Vengsarkar Academy Triumphs in U-11 Cricket Tournament व्हेरॉक-वेंगसरकर अकादमीला 'व्हेरॉक करंडक' क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
पिंपरी, ७ मार्च २०२५: पीसीएमसीज् व्हेरॉक-वेंगसरकर अकादमीने आयोजित केलेल्या ११ वर्षांखालील गटातील ‘व्हेरॉक करंडक’ क्रिकेट स्पर्धेत यजमान व्हेरॉक-वेंगसरकर अकादमीच्या संघाने क्रिक फायटर्स संघावर ४८ धावांनी मात करत विजेतेपद पटकावले. या सामन्यात गोलंदाज सुधाकर राठोडला उत्कृष्ट कामगिरीसाठी सामन्याचा मानकरी घोषित करण्यात आले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण सल्लागार राजेंद्र दुर्वे, महापालिकेचे सहशहर अभियंता मनोज सेठिया, कार्यकारी अभियंता विजय जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, अकादमीचे प्रशिक्षक राहुल वेंगसरकर, चिंतामणी वैद्य, चंदन गंगावणे, प्रमोद लिमण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
वेंगसरकर यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले, “खेळापेक्षा कुणीही मोठा नाही. खेळाडूंनी शिस्तप्रिय असायला हवं. मैदानावर प्रतिस्पर्धी संघाला कमी न लेखता, एकमेकांचा आदर केला पाहिजे. पंचांच्या निर्णयाचा आदर करणंही तितकंच महत्त्वाचं आहे.”
स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून यशवर्धन आजबे (क्रिक फायटर्स) तर उत्कृष्ट गोलंदाज आणि सर्वोत्तम खेळाडू म्हणून सुधाकर राठोड (व्हेरॉक-वेंगसरकर) यांना गौरविण्यात आले.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान संघाने प्रथम फलंदाजी करत २१६ धावांचे लक्ष्य क्रिक फायटर्ससमोर ठेवले. यामध्ये शौर्य कांबळे आणि युनूस खान यांची अर्धशतकी खेळी महत्त्वाची ठरली. या आव्हानाचा पाठलाग करताना यशवर्धन आजबे व्यतिरिक्त इतर फलंदाज यजमान संघाच्या गोलंदाजीसमोर टिकाव धरू शकले नाहीत. यशवर्धनचे अर्धशतक केवळ एका धावेने हुकले आणि संघाचा डाव १६९ धावांवर आटोपला.
या विजयानंतर व्हेरॉक-वेंगसरकर अकादमीच्या खेळाडूंनी मोठा आनंद व्यक्त केला आणि स्पर्धेच्या यशस्वितेसाठी सर्व समर्पित कार्यकर्त्यांचे आणि प्रशिक्षकांचे आभार मानले.