कोण आहेत बडवे ?
२००५ साली राज ठाकरे यांनी शिवसेना सोडताना, २०२२ साली एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडताना व आज छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना सोडताना ‘बडव्यांना बाजूला करा व आम्हाला आमच्या विठ्ठलाला भेटू द्या असा उल्लेख केला होता’. ज्यांचा सतत उल्लेख होतो ते बडवे आहेत कोण?
काय म्हणाले होते राज ठाकरे
माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही, त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. आजपर्यंत या बडव्यांच्या मर्जीने माझ्या विठ्ठलाचं दर्शन घेत आलो. हे माझ्या विठ्ठलाचं मंदिर आहे, बडवे त्यांचं मंदिर समजायला लागले. चार कारकून शिवसेनाप्रमुखांनी उभी केलेली बलाढ्य संघटना सांभाळणार असतील तर ते मला कधीही मान्य होणार नाही. शिवसेना संपवणाऱ्यांच्या पापाचा वाटेकरी मी होऊ शकत नाही
एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बंड करत, शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडाली व भाजपा बरोबर हातमिळवणी करत नवीन सरकार स्थापन केल. “मधल्या काळात जे मिळालं ते बाळासाहेबांनंतरच्या शिवेसनेनं दिलं हे कृपा करून लक्षात ठेवा”, हे विधान स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.
काय म्हणाले होते संजय शिरसाट
म्हणजे, २०१२ पूर्वीची (बाळासाहेबांच्या निधनापूर्वीची) शिवसेना आणि २०१२ नंतरची शिवसेना अशी विभागणी करता येऊ शकेल. या काळात शिवसेना कशी बदलली, किती बदलली, यावर प्रत्येकाचं वेगळं मत असेल किंवा आहे. पण, एका गोष्टीच्या बाबतीत गेल्या १६-१७ वर्षांत शिवसेना बदललेली दिसत नाही, असं म्हणावं लागेल आणि ती गोष्ट म्हणजे ‘शिवसेनेतील बडवे’. असा उल्लेख एकनाथ शिंदे समर्थक आमदार संजय शिरसाट यांनी लिहिलेल्या पत्रात होता.
काय म्हणाले होते छगन भुजबळ
आम्हाला विचारलं जातं की शरद पवारांचा फोटो का वापरला? अरे, साहेब आमचे विठ्ठल आहेत, पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. त्या बडव्यांना बाजूला करा आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला या अशी माझी शरद पवार यांना विनंती आहे.
कोण आहेत बडवे ?
बडवे एक घराणं आहे, या एका घराण्याचा उल्लेख राजकारणात कायम करण्यात येतो.पंढरपूरच्या विठ्ठलाचे पुजारी बडवे विठोबा जी परंपरेने सेवा करणारे घर.१००० वर्षांपासून म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या आधीपासून हे घर पंढरपुरात विठ्ठला ची पूजा करत असल्याचे पुरावे सापडतात. पांडुरंगा च्या पूजेचा मान पिढ्या न् पिढ्या याच घराण्याकडे होता. या घराण्यात प्रल्हाद महाराजांसारखे खूप चांगले पुजारी देखील होऊन गेले. जेव्हा जेव्हा पंढरपुरा वर संकट आलं तेव्हा त्यांनी विठोबा च्या मूर्ती चे संरक्षण केल्या चे पुरावे सापडतात. पूजे सोबतच पंढरपूरच्या मंदिरा चे नित्य उपचार व व्यवस्थापना बघणं हे काम बडवे पिढ्यानपिढ्या करत आले आहेत.
पण मग असं नक्की काय झालं की त्यांचं नाव बदनाम झाले तर मंदिराच्या व्यवस्थापन बघत असताना हळूहळू या घराण्या ने विठ्ठल मंदिरा वर मक्तेदारी दाखवण्यास सुरुवात केली असं बोललं जातं. त्यांनी वारकर्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. संत चोखामेळा सारख्या संतांनी देखील त्यांच्या अभंगातून याचा उल्लेख केला आहे. भक्तांचा मानसिक छळ आणि आर्थिक पिळवणूक याबद्दलची नाराजी विठुरायाकडे खालील ओळींतून व्यक्त केली.
धांव घाली विठू आता चालू नको मंद। बडवे मज मारिति ऐसा काही तरि अपराध ॥१॥
विठोबाचा हार तुझे कंठीं कैसा आला। शिव्या देती म्हणती महारा देव बाटविला ॥२॥
अहोजी महाराज तुमचे द्वारींचा कुतरा। नकाजी मोकलू चक्रपाणि जिमेदारा ॥३॥
जोडुनिया कर चोखा विनवितो देवा। बोलिला उतरी परि राग नसावा ॥४॥
जुने व्यवस्थापन वाढत्या भाविकांच्या गर्दीचे नियोजन आणि सोयीसुविधा यांची सोय करताना कमी पडत असत. भाविकांची मंदिर आणि परिसरात लूट करणे असे आक्षेप त्यांच्या वर घेतले जाऊ लागले. ज्यामुळे प्रकरण कोर्टापर्यंत पोचलं १९६७ साली सर्वप्रथम राज्य शासनाकडून एक समिती स्थापन करण्यात आली. विठ्ठल मंदिरावरील बडवे घराण्याचे परंपरागत अधिकार काढून घेण्यासाठी या समितीने अहवाल सादर केला.
त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर कायदा १९७३ साली अस्तित्वात आला आणि या कायद्या ने बडव्यांचे अधिकार गोठवण्यात आले. मात्र आपल्यावरील अन्याय आहे या भावनेने बडव्यांनी या कायद्याच्या वैधते ला आव्हान देणारी याचिका १९७४ साली सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. पुढे जवळपास ४० वर्षे लढा देऊन ही बडवे समाजाच्या विरोधात सर्व निकाल लागल्याने अखेर १४ जानेवारी २०१४ रोजी विठ्ठल मंदिर संपूर्णपणे शासनाच्या ताब्यात आले.
असा आहे या बडवे घराण्याचा इतिहास याच वादग्रस्त इतिहासाने बडवे या शब्दाला वेगळा अर्थ प्राप्त झाला. राजकारणाच्या वर्तुळात महाराष्ट्रच्या जनमानसावर वारकरी संप्रदाया चा खूप मोठा प्रभाव आहे. बडव्यांनी वारकर्यांना जो त्रास दिला त्यातून त्यांची भावना झाली की विठोबा चं दर्शन घेताना आम्हाला बडवे त्रास देतात म्हणून महाराष्ट्रात आपल्या नेत्यांच्या आसपास असणारे लोक जे नेता आणि आपल्याला अडथळा ठरतात त्यांना बडवे म्हणायची सुरुवात झाली.अशाप्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणात नेता आणि कार्यकर्ता यांच्यात दुरावा निर्माण करणार्या व्यक्तींसाठी बडवे हा शब्द सूचकपणे वापरण्याची पद्धत आहे.