Shivaji Brigade Demands: Agreements in Municipal Corporation Should Be in Marathi संभाजी ब्रिगेडची मागणी: महापालिकेतील करारनामे मराठीतून करावेत
मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी प्रशासकीय कामकाज मराठीतून होणे आवश्यक आहे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेने सर्व करारनामे मराठीतून करावेत, अशी विनंती केली आहे. यासंदर्भात संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे आणि कार्याध्यक्ष विशाल मिठे पाटील यांनी आयुक्त शेखर सिंह आणि मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेचे अनेक विभाग आणि संस्थांसोबत केलेले करार इंग्रजी भाषेत होतात. स्थानिक स्वराज्य संस्थेला मराठीत कामकाज करणे बंधनकारक असताना, अनेक विभाग प्रमुख इंग्रजीमध्ये करारनामे करतात. केंद्र सरकार, इतर राज्ये, भारतीय राजदूतावास, परराष्ट्रीय दूतावास, महालेखापाल, उच्च आणि सर्वोच्च न्यायालय यांच्याशी पत्रव्यवहार इंग्रजीमध्ये होऊ शकतो, मात्र महापालिकेने आपल्या सर्व करारनाम्यांना मराठीत करण्याची आवश्यकता आहे.
याबाबत राज्य शासनाने कायदे केले असून, प्रशासनात लोकसहभाग वाढविण्यासाठी मराठी भाषेचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. जर कोणत्याही विभागप्रमुखाने मराठीत करारनामे केले नाहीत, तर त्यांच्यावर राजभाषा अधिनियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.