Abhay Bhor Demands Appointment of Special Officer for Resolving Issues in Pimpri-Chinchwad MIDC पिंपरी-चिंचवड एमआयडीसीच्या समस्यांसाठी विशेष अधिकारी नियुक्त करावेत, अभय भोर यांची मागणी
पिंपरी-चिंचवड एमआयडीसी हद्दीतील समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) विशेष अधिकारी नियुक्त करावेत, अशी मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी केली. ही मागणी पुणे येथील एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरसू यांच्यासोबत झालेल्या बैठकीत करण्यात आली. या बैठकीस दुर्गा भोर, उद्योजक आणि एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पिंपरी-चिंचवड एमआयडीसीमध्ये जाणवणाऱ्या मूलभूत सुविधा आणि समस्या यावर चर्चा झाली. महापालिका आणि एमआयडीसी यांच्या वादामुळे उद्योजकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते, ज्यामुळे समस्यांवर उपाय सापडत नाहीत. या संदर्भात दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन तत्काळ मार्ग काढावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी, शहरातील महिलांना स्टार्टअप उद्योग उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची गरज सांगितली. तसेच औद्योगिक परिसरातील कचऱ्याच्या समस्येबद्दलही चर्चा झाली. कचऱ्यामुळे उद्योजक आणि कामगारांना त्रास होतो आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात, म्हणून त्याची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक असल्याचे सांगितले गेले.