Pavanathadi Fair to Provide Platform for Women’s Self-Help Groups, Cultural Programs Announced पवनाथडी जत्रेत महिला बचत गटांना मिळणार व्यासपीठ, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

सांगवी, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पवनाथडी जत्रेचे उद्घाटन होणार आहे. सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर २१ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत जत्रेचे आयोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पवनाथडी जत्रेचे आयोजन केले जात आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, जत्रेचे आयोजन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरांना प्रकट करण्यासाठी केले आहे. यामध्ये महिलांच्या बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना प्रसिद्धी मिळवून त्यांना एक व्यासपीठ देण्याचे काम केले जात आहे.
पवनाथडी जत्रेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही असणार आहे. या जत्रेमध्ये दररोज सायंकाळी ६ वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. २१) ‘समर्थ प्रोडक्शन्स’ प्रस्तुत ‘महाराष्ट्राची गौरवधारा’ हा कार्यक्रम सादर होईल. शनिवारी (दि. २२) ‘मेरा भारत महान’ हा देशभक्तीपर गीतगायनाचा कार्यक्रम होईल. रविवारी (दि. २३) ‘जागर स्त्री शक्तीचा, सूर गृहलक्ष्मीचा’ हा कार्यक्रम सादर होईल.
तसेच, दिव्यांग आणि तृतीयपंथीयांसाठीही पवनाथडी जत्रेत स्टॉल्स राखीव ठेवण्यात आले आहेत. ७५० बचत गटांना लकी ड्रॉद्वारे स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत, जेणेकरून त्या गटांना आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करता येईल.
यामुळे महिलांना तसेच अन्य दुर्बल घटकांना व्यासपीठ मिळवून देण्यात महापालिकेचे महत्त्वाचे योगदान राहील.