Traffic on Kudalwadi Road Closed Until February 20 Alternate Routes Issued २० फेब्रुवारीपर्यंत कुदळवाडी मार्गावरील वाहतूक बंद पर्यायी मार्ग वापरण्याचे आदेश

Traffic on Kudalwadi Road Closed Until February 20 Alternate Routes Issued२० फेब्रुवारीपर्यंत कुदळवाडी मार्गावरील वाहतूक बंद पर्यायी मार्ग वापरण्याचे आदेश
चिखलीतील कुदळवाडी-जाधववाडी परिसरात महापालिकेने अतिक्रमणे काढण्याची कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे तळवडे, भोसरी, निगडी आणि महाळुंगे वाहतूक विभागांनी कुदळवाडीकडे जाणाऱ्या मार्गांवरील सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गांनी वळविली आहे. वाहतूक पोलिस विभागाचे उपायुक्त विशाल गायकवाड यांनी यासंदर्भात आदेश दिले असून, काही रस्त्यांवरील वाहतूक २० फेब्रुवारी रात्री नऊपर्यंत बंद राहणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
रविवारी (ता. ९) सलग दुसऱ्या दिवशीही कुदळवाडी आणि जाधववाडी येथील अनधिकृत बांधकामे काढण्याची कारवाई सुरूच होती. आळंदी-देह रस्त्यावरील लक्ष्मी चौक ते मोई फाटा दरम्यानच्या रस्त्याला रहदारीसाठी बंद करण्यात आले होते. मात्र, शनिवारच्या कारवाईमुळे रविवारी काही अनधिकृत बांधकामे दुकानदारांनी स्वतःहून काढून घेण्यास सुरवात केली. पोलिस, अतिक्रमण विभाग आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी कारवाईच्या ठिकाणी तळ ठोकून होते.
रविवार असल्याने रस्त्यावर वाहनांची संख्या कमी होती, पण अतिक्रमणे हटवताना विजेच्या तारांचा अडथळा येत होता. त्यामुळे महावितरण विभागाने सकाळपासून वीजपुरवठा खंडित ठेवला होता. यामुळे काही नोकरदार आणि शाळा-कॉलेजांना सुट्टी होती, पण घरांमध्ये असलेल्या नागरिकांना खंडित विजेचा त्रास सहन करावा लागला.
पोलिस कर्मचारी आणि महिला कर्मचारी दिवसभर उन्हात उभे राहून अतिक्रमण काढण्याचे काम करत होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंची दुकाने तोडली गेली होती, आणि यापुढेही काही दिवस अतिक्रमण काढण्याचे काम सुरू राहील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कारवाईच्या ठिकाणी अचानक गॅस गळती होत असल्याची माहिती मिळाल्यावर, अग्निशामक दलाचे जवान त्वरित घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गॅस गळती थांबवून मोठा अनर्थ टाळला.
- देहूकडून चिखलीमागे कुदळवाडीकडे येणाऱ्या वाहने:
- या मार्गावरील वाहने चिखली चौकातून उजवीकडे वळून नेवाळेवस्ती-साने चौक- कृष्णानगर भाजी मंडई चौक- स्पाइन रोड मार्गे इच्छित स्थळी जातील.
- मोशीकडून चिखलीमागे देहूकडे जाणाऱ्या वाहने:
- या मार्गावरील वाहने रविरंजन वजनकाटा येथून डावीकडे वळून सिल्व्हर जिम आहेरवाडी चौक- छत्रपती शिवाजी महाराज चौक- जाधव सरकार चौक- स्पाइन रोड मार्गे इच्छित स्थळी जातील.
- मोईकडून कुदळवाडीकडे जाणाऱ्या वाहने:
- या मार्गावरील वाहने महिंद्रा अॅड महिंद्रा कंपनी- निघोजे- तळवडे ब्रिज मागे किंवा चिंबळी फाटा- नाशिक महामार्गाने इच्छित स्थळी जातील.
- कुदळवाडी सर्कल (ब्रिजवरील व ब्रिजखालील बाजू)- मोरे पाटील चौक- डायमई चौक बाजूकडे जाणारी वाहने:
- या मार्गावरील वाहने कुदळवाडी सर्कल-जाधव सरकार चौक किंवा कुदळवाडी सर्कल ते चेरीचौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
- आहेरवाडी चौक ते विसावा चौक ते चौधरी वजनकाटा या रस्त्यावरील वाहने:
- या मार्गावरील वाहने आहरेवाडी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जाधव सरकार चौक मागे इच्छित स्थळी जातील.
- आळंदी-देहूकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी लक्ष्मी चौक ते डायमंड चौक दरम्यान प्रवेश बंदी:
- या मार्गावरील वाहने लक्ष्मी चौकातून डावीकडे वळून शिवरस्त्याने इंजिनिअरिंग चौक (सीओपीई)- जाधववाडी मार्गे इच्छित स्थळी जातील.