Chikhli Murder Over Liquor Money: Three Arrested Within 24 Hours चिखलीत दारूच्या पैशांसाठी खून; तिघांना अटक
चिखली, चिखलीतील पाटीलनगर येथील वन विभागाच्या जागेत एका व्यक्तीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत व्यक्तीची ओळख पटली असून, दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करण्यावरून हा खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने केवळ २४ तासांच्या आत तपास करून तिघांना अटक केली आहे. आरोपींपैकी एक सराईत गुन्हेगार आहे.
मृत व्यक्तीचे नाव भैय्या गमन राठोड (वय ३३, रा. पाटीलनगर, चिखली, मूळ- सोनगाव, केरडे, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) आहे. अटक केलेल्या आरोपींच्या नावात सूरज हनुमंत इंगळे (वय २९), मेहुल कैलास गायकवाड (वय २८), आणि अजय अशोक कांबळे (वय २४, सर्व रा. इंदिरा गार्डनजवळ, पाटीलनगर, चिखली) यांचा समावेश आहे.
राठोड यांचा मृतदेह रविवारी (ता. २) सकाळी वन विभागाच्या जागेत आढळला होता. श्वानाने मृतदेहाचे लचके तोडले होते. उत्तरीय तपासणीमध्ये डोक्यात घाव घालून खून केल्याचे उघड झाले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि परिसरातील ५० ते ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यावरून तीन आरोपींचा सहभाग खुनात असल्याचे समोर आले. सखोल तपासात, राठोड यांना दारू पिण्यासाठी पैसे मिळवण्यासाठी डोक्यात दगड घालून आणि हत्याराने वार करून खून केल्याचे स्पष्ट झाले.
राठोड हे मूळचे जळगावचे असून, तीन महिन्यांपूर्वी ते कुटुंबासह चिखलीत आले होते. अजय कांबळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चिखली, पिंपरी व महाळुंगे एमआयडीसी येथे अनेक गुन्हे दाखल आहेत.